शट-डाऊन: अर्थ आणि अन्वयार्थ
“शट-डाऊन” म्हणजे एखादी प्रक्रिया / कारभार बंद ठेवणे. उद्योग धंद्यात (विशेषत: मॅन्युफॅक्चरींग इंडस्ट्री मध्ये) काम करणार्यांना “शट-डाऊन” हा शब्द परिचयाचा आहे. वर्षातून एखादं वेळा मेंटेनन्स साठी पूर्ण किंवा काही प्रमाणात उत्पादन प्रक्रिया खंडित केली जाते त्याला “शट-डाऊन” (किंवा Schedule Outage) असे म्हटले जाते. अर्थात उत्पादन बंद करण्याची ही पद्धत काही निश्चित ध्येये ठेवून अतिशय काटेकोर नियोजन करूनच केली जाते. IT मधेही असे “शट-डाऊन” करण्याची वेळ येते. मॅन्युफॅक्चरींग मध्ये किंवा IT मध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास अपवादात्मक परिस्थितीतसुद्धा असे “शट-डाऊन” करावे लागते. पण आणीबाणीच्या परिस्थितीत केलेले “शट-डाऊन” सुद्धा विशिष्ट प्रक्रियेनुसारच केले जाते.
आता समजा, या क्षेत्रातील मंडळींपैकी कुणाला संपूर्ण देशभर “शट-डाऊन” करायला सांगितला तर ते कसे करतील? मॅन्युफॅक्चरींग मधील माणूस प्रथम प्रत्येक प्रक्रियेच्या (Process) / खात्याच्या प्रमुखाशी संपर्क करून त्यांना संभाव्य “शट-डाऊन” ची कल्पना देऊन सर्वांबरोबर चर्चा करेल. कोणत्या प्रक्रिया पूर्ण बंद करावयाच्या कोणत्या काही प्रमाणात करावयाच्या आणि कोणत्या प्रक्रिया चालू ठेवणे भाग आहे हे ठरवले जाईल. प्रत्येक प्रमुखाकडून त्यांना येणार्या संभाव्य अडचणी, त्यावरचे उपाय, याची यादी केली जाईल. त्यांना कोणती मदत हवी आहे ती कशी पुरवली जाईल हे ठरवले जाईल. कोणी कधी, कसे आणि कोणाच्या संपर्कात राहायचे हे आणि सर्व परिस्थितीची माहिती सर्वांपर्यंत कशी, कधी आणि कोणाकडून प्रसारित केली जाईल हे नक्की केले जाईल. आणि मुख्य म्हणजे पुन्हा सर्व चालू करताना कोणत्या क्रमाने, कधी आणि कसे चालू करावयाचे याचा आराखडा निश्चित होईल.
IT क्षेत्रातील माणूसही असेच करेल. माझ्या मते त्याची एक स्टेप आणखी असेल. ती म्हणजे, “शट-डाऊन” नंतर एक सर्व संबंधितांची (Stakeholders) मिटिंग घेतली जाईल (GO-NoGO निर्णय घेण्यासाठी). म्हणजे आपण केलेले “शट-डाऊन” योग्य झाले आहे ना? त्याचा अपेक्षित परिणाम होतो आहे की काही सुधारणा करणे आवश्यक आहे? का पुन्हा Roll Back करावयाचे? याचा निर्णय घेण्यासाठी. (अर्थात Roll Back चा आराखडा आधीच तयार ठेवलेला असेल).
काय आहे, शेवटी माणसाची निर्णयक्षमता ही त्याच्या बुद्धीच्या क्षमतेवर आणि त्याला असलेला पूर्वानुभव यावर अवलंबून असते.
आता तुम्ही चहाची टपरी बंद होताना पाहीली आहे? तो टपरीवाला आजूबाजूच्या दुकानांचा (भेळवाला, इडलीवाला ) कल बघतो आणि तोच निर्णय घेतो की तासाभरात टपरी बंद. पोऱ्याला विचारात बसत नाही. फक्त ऑर्डर देतो की आवरायला घे. झाल....
दोन वर्षापूर्वी उपाशीपोटी आपल्या कच्या-बच्यांसह शेकडो मैल तंगडतोड करणाऱ्या मजूरांचे तांडे पाहून हेच मनात आल होत. अस कोणी कस काय करू शकत?
सौर दिनांक - चैत्र ३,शके १९४४